

वाहून गेले सगळे
पाऊस असा पडला की
बरीच स्वप्ने वाहून गेली ।
बरेच काही घडवायचे होते,
सगळं आता राहून गेले ।
घरं गेली, गुरं गेली, शेती गेली,
काहींची तर नाती सुद्धा वाहून गेली ।
खरं सांगू मित्रांनो,
ह्या वेळी पावसाने आयुष्याची मातीच केली ।
सगळं काही बुडाले होते,
प्राण तेवढा तरंगत होता,
या वेळी वरूण राजा भलत्याच तांबड्या रंगात होता ।
पाऊस जरी थांबला काही,
अश्रूंचा पूर आला मोठा,
येरे येरे पावसा म्हणता,
पैसा खरंच झाला खोटा ।
पाणी आता निसरू लागलं,
घरं परत दिसू लागली,
सगळी कडे मातीच माती,
पुढे काय ह्याचीच भीती,
पावसा तू हे काय केलेस,
सगळं काही वाहून नेलेस ।
आता रडून काही चालायचे नाही,
ह्यातून उठल्याशिवाय भागायचे नाही,
ह्या काळालाही वेळेच्या प्रवाहसोबत वाहून देऊ ।
काल परत यायचा नाही,
उद्या आल्याशिवाय राहायचा नाही,
प्रयत्नानेच ह्यातून बाहेर येऊ,
चला स्वप्नांना पुन्हा वाहून देऊ ।
१७ ऑगस्ट २०२१
(महाराष्ट्रातील यंदाच्या पूर संकटावर आणि पूरग्रस्थांना धीर देण्याचा प्रयत्न करण्याचा हेतूने लिहिलेली एक कविता)
